पुनरुज्जीवन

(Note:- This post, in it’s entirety has been written in Marathi, an Indian language. Non-Marathi/Overseas readers, pray stay tuned for a probable English version in near future. And of course I’ll be really pleased if you could have a look at some of my other posts in English in the meanwhile!😅)

नमस्कार!

आणि सुस्वागतम माझ्या मराठीतल्या चौथ्या वं या कथामालिकेतल्याही चौथ्या लेखामध्ये!

खरं सांगायचे झाले तर मला कधी वाटले नव्हते की या कहाणीचा चौथा अंक लिहायची गरज भासेल. कारण तसं बघायला गेलं तर या कथेला मी मागील अंकातच म्हणजे संबंध या लेेेेखा मध्येच एक प्रकारेे पूर्णविराम दिला होता.

पण, त्यानंतर माझ्या लक्षात आले की कथेतील काही पैलूंवर प्रकाश टाकणं माझ्या हातून साफ राहून गेलं होतं. आणि त्यातूनच मला या मालिकेत अजून एक अध्याय जोडायची गरज असल्याचे जाणवले.

कारण, गरज होती एक असा अध्याय जोडण्याची जो पहिल्या तीन लेखांपासून तसा तर फार वेगळा असेल, परंतु वस्तुस्थिती अवश्य दर्शविणारा असेल.

तर मग चला! कथेच्या या अंतिम टप्प्याला पार पडण्यास आपण आरंभ करूया!

( टीप:- जर तुम्ही या कथेचे पूर्वीचे लेख वाचले नसतील तर हा लेख वाचण्या आधी ते जरूर वाचा जेणे करून तुम्हाला या कथेतील विविध प्रसंग व त्यांचे महत्त्व व्यवस्थित समजेल. धन्यवाद!

माझं पहिलं प्रेम

समुद्र

संबंध )

पुनरुज्जीवन

Screenshot_20201208-093229_Chrome

१२:२५

नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेच्या ५ मिनिटं आधीच मी हजर होतो. लहान-सहान गोष्टींच्या बाबतीतली काटेकोरपणाची सवय काय माझी गेली नव्हती. आणि बहुदा तिचीही नव्हती. कारण माझ्यापाठोपाठ लगेचच तिचाही चेहरा मुख्य दरवाज्यातून डोकावला.

आणि मला शोधू लागला.

एवढ्या वर्षांनी जरी आम्ही एक दुसऱ्याला भेटत असलो तरी आमच्या आठवणी आणि आमचा स्वभाव असा होता की आम्ही एकमेकांना अगदी कुठेही ओळखू शकलो असतो.

आजही तेच घडले.

मी उभा राहून तिला हाथ दाखवण्याच्या आतच तिचे डोळे माझ्यावर येऊन स्थिरावले. आणि एक लहानसं हसू तिच्या गालावर पसरले. अर्थातच माझ्याही. पण आमच्या हसण्यात अनेक प्रश्नांचं व अडचणींच ओझं होतं. जे या भेटीमागचा इतिहास पाहता साहजिकच होतं.

“उशीर नाही झाला ना मला फार?” ती स्वतःच्या घड्याळाकडे बघत म्हणाली.

तिच्या बाबतीत मला आवडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी ही एक. तिचा प्रामाणिकपणा. एरवी टंगळ-मंगळ करणारी व अनेक उद्योग करणारी ही मुलगी, जेव्हा कुठली गोष्ट ठरवायची तेव्हा ती मनापासून केल्याशिवाय राहत नसे. तिच्या त्या गोलसर चेहऱ्यावरच्या विनाकारणाच्या चिंतेच्या आठ्या व तिचे गंभीर डोळे पाहून माझ्या हसण्यात अचानकच थोडी मिश्किलता व मृदुता आली.

माझ्या आठवणीतली ‘ती’ अजूनही जिवंत आहे हे पाहून माझ्या मनाला समाधान मिळाले.

“नाही, नाही!अगं मीच लवकर आलो!” मी तिला आश्वस्त करत म्हणालो.

“अच्छा.” ती म्हणाली व काहीशी निर्धास्त झाली.

“अगं उभी का आहेस? बस की!”

जशीच तिची पाऊलं माझ्यादिशेने वळली होती तसंच मी तिच्या स्वागतास्तव उभा राहिलो होतो. आणि बहुतेक तिही त्याच्यामुळेच उभी होती. कारण मी उभा होतो.

आता ती बसल्या शिवाय अखेर मी ही कसा बसणार?

“हा” ती जरा हसून म्हणाली. पण या वेळचे तिचे हसू थोडे खुललेले व निवांत वाटत होते.

अखेर आम्ही दोघे आसनस्थ झालो तर खरे, पण बसल्यावरही आम्हा दोघातली शांतता काही मिटेना. शेवटी तीच आम्हा पुढचे मेनू कार्ड पाहता बोलती झाली.

” रेस्टॉरंटचं नाव छान आहे.” ती जरा हसतच म्हणाली.

ते तर साहजिकच होतं. कारण ते रेस्टॉरंटचं नाव तिचंच तर होतं!

“होय का?!” मी भुवया उंचावून मिश्किल सुरात म्हणालो.

“हो.” ती ही मस्करीत म्हणाली.

“तू आला आहेस का इथे फार?” तिने मला विचारले.

“हो. मी लहानाचा मोठा याच परिसरात झालो. तेव्हा काही फार येणं व्हायचं नाही इथे. पण अधून मधून फेऱ्या असायच्या कधीतरी.” मी म्हणालो.

“अच्छा. कसं आहे इथलं जेवण?” तिने विचारले.

“जेवणात मीठ कमी असतं इथल्या” मी अगदी वाईट, सुकट चेहरा करून म्हणालो. आमच्यातले ताणलेले संबंध पाहता तिला माझी चेष्टा समजणं जरा कठीणच होतं. पण सुदैवाने माझे डोळे सर्व काही बोलून गेले.

“असं आहे का?! ” ती जोरात हसून म्हणाली.

“खरंच!” मी ही तिच्या हसण्यात आपले हसू जुळवत म्हणालो.

“तसं साऊथ इंडियन चांगलं मिळतं इथे.” आमचे हसू आजूबाजूच्या आवाजात अलगद विरल्यावर मी म्हणालो.

“अच्छा…. आणि चहा?”

“चहा? दुपारी १२ वाजता?!” मी माझ्या भुवया उंचावत तिला विचारले.

त्यावर ती ही भुवया उंचावत माझ्याकडे बघती झाली.

“सॉरी, सॉरी! मी विसरलोच होतो मी कोणाशी बोलतोय ते!” मी मनसोक्त हसत म्हणालो.

चहा म्हणजे जणू तिचं पहिलं प्रेमच होतं. इतकं की तिच्या मैत्रिणी तिला तिच्या रक्तवाहिन्यांत रक्त नाही तर चक्क चहा वाहत असेल असं चिडवायचे.

तेवढ्यातच तिथला वेटर आमच्याकडे ऑर्डर घेण्यासाठी आला आणि आमच्या संवादाला अल्पविराम बसला.

“तसं… इथे कसं काय येणं झालं तुझं आज?” आमचा वेटर आमची ऑर्डर घेऊन गेल्या नंतर मी तिला विचारले.

निव्वळ संवाद वाढवण्या हेतू विचारलेल्या त्या निरागस प्रश्नाने आमच्या संवादाला असं वेगळंच वळण लागेल, ह्याची मात्र मी कल्पना देखील केली नव्हती.

“अरे… खरं सांगायला गेलं तर… मी….” ती आपल्या हातातील चमच्याकडे एका दबक्या वं गंभीर अश्या सुरात बोलत म्हणाली.

“माझा इथे येण्याचा मूळ हेतूच तुला भेटण्याचा होता.” एक लांब श्वास घेत अखेर ती माझ्याशी नजर जुळवून म्हणाली.

माझ्या कानांना मात्र त्यांनी ऐकलेल्या शब्दांवर विश्वास करण्यास साफ नाकारले.

“म्हणजे?!” मी तिला आश्चर्याने विचारले.

माझी ती प्रतिक्रिया बघून ती अतिशय अस्वस्थ झाली आणि त्यावरून मला अखेर परिस्थितीचे गांभीर्य जाणवले.

“तू इतक्या दूर, एवढ्या लांबचा प्रवास फक्त मला भेटण्यासाठी केलास?!”

“हो.” ती अगदी लहानश्या सुरात म्हणाली.

अचानकच पाणावलेले तिचे ते डोळे पाहून मी अवाक झालो. प्रत्युत्तरार्थ माझ्याकडे शब्दच नव्हते.

“तू ही हे केलयस की!”

अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांचा भार तिच्या आवाजात आता स्पष्टपणे जाणवू लागला होता.

“हो, पण…. तुला भेटण्याचा उद्देश नव्हता गं तेव्हा माझा”

मी उच्चारलेल्या त्या वाक्याने अगदी सहज अत्यंत कष्टाने दशकभरापूर्वी मी दाबलेल्या त्या भावनांचा उद्रेक आता कोणत्याही क्षणी होण्याची भीती मला जाणवू लागली.

“हो रे. पण तरीही.” ती हळुवारपणे मान हलवत म्हणाली.

“अगं पण, एक दशक लोटलं गं त्याला आता! असं काय घडलं की तुला मला प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा झाली? गेल्या दहा वर्षात आपण एक दुसऱ्याशी साधे दोन शब्द बोललो देखील नाही. मग भेटणं तर दूरच राहिलं.” मी तिला म्हणालो आणि बोलता बोलता पहिल्यांदाच माझ्या आवाजात तीव्र नाराजीची वं आता पर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या क्रोधाची झळ मला जाणवली.

आणि बहुदा तिलाही ती जाणवली होती.

कारण तिने आतापर्यंत रोखून धरलेली अश्रूंची ती धार अखेर तिच्या गालांवर वाहती झाली होती.

“थोडक्यात सांगायला गेलं तर…. मला माझ्यातली माणुसकी पुन्हा गवसली.”

* * *

Screenshot_20201208-092301_Chrome

१० वर्षांपूर्वी…

ए पहिलं हिला द्या रे! आज पोरगी जास्तच उत्साहात आहे!”

एका मित्राच्या घरी, त्याचे आईबाबा किव्हा इतर कोणी वडीलधारी व्यक्ती नाहीत या गोष्टीची संधी साधून आम्ही सगळे पार्टीला जमलो होतो. थकवणाऱ्या आणि कंटाळवाण्या आयुष्याच्या आमच्या त्या ‘phaseमध्ये ‘recreation’ म्हणून.

पूर्ण रात्र साऱ्या गोष्टींचं भान विसरून नुसती मौज – मजा करण्याच्या तयारीत असलेल्या माझ्या मनाचा आनंद गगनाला भिडला होता व म्हणून मी माझ्या मित्राने दिलेला तो शॉट ग्लास अतिउत्सहात टेबलवर टक- टक करून वाजवू लागले.

राजेशच्या बोलण्याला हसत शशांक ने एक – एक करून सगळ्या ‘ ग्लास धारकांना’ त्याची महागडी वोडका सर्व करायला घेतली. पार्टी मधील काही लोकांनी सोबर राहायचा निर्णयही घेतला होता. त्यात माझ्या काही खास मैत्रिणींचाही समावेश होता. आणि…. त्याचाही.

शशांकने बॉटल त्याच्या ग्लासकढे वळवताच त्याने हातवारे करून त्याला ती व्होडका ओतण्यापासून रोखले.

मी मात्र माझा पहिला शॉट लगेच रिकामा करून शशांक कडे दुसरा मागती झाले.

“अगं वर्षा! जास्त पिऊ नको. तुला दोन शोट मध्येच चढते, माहिती आहेना तुला?” उदय मला सावध करीत म्हणाला.

मी त्याच्याकडेही दुर्लक्ष करत एकूण ५ शॉट गिळंकृत केले. आणि तेही रिकाम्या पोटी.

त्याचा व्हायचा होता तो परिणाम झालाच.

असं म्हणतात की दारूच्या नशे मुळे माणसाचा मूळ स्वभाव उजेडाला येतो. कारण दारूमुळे माणसाचे स्वतःच्या मनावरचे नियंत्रण सुटते.

साहजिकच मी काही या नियमाला अपवाद नव्हते.

एरवी सरळ, सोज्वळ व सभ्य असणारी मी नशेमध्ये माझ्या मनावरचे सगळे निर्बंध सोडून द्यायचे. किंबहुना त्या मुळेच मला नशा आवडायला लागली होती.

कारण माझ्या मनाला कायमच एक सुटका हवी असायची. त्याच्यातील भिडस्तपणा सोडून बिनधास्त, निरभयी व मोकळेपणाने आपले पंख पसरवून मनसोक्त उडण्याचे तेव्हा तर त्याला जणू वेडच लागले होते.

पण मनमोकळेपणे, no-filtered जगणं अथवा Grow up होणं म्हणजे निर्दयीपणे केवळ स्वतःच्या इच्छेनुसार वागणं, कोणाशीही कसंही उद्धटपणे वर्तन करून केवळ आपण म्हणू तीच पूर्व दिशा होत नाही हे कळायला मला फार वेळ लागला.

“अगं! काय करतेस तू?” शिवानी माझ्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली.

नशेत मी उदयच्या पायाला चक्क लाथ मारत होते.

“तू पण मार ना! मी आज सगळ्या पोरांना मारणार आहे. मजा येते!” मी गालातल्या गालात हसत म्हणाले.

शिवानी माझ्याकडे बघून जोरात हसायला लागली. प्यायली तर ती ही होती. पण नियंत्रणात.

“अगं येडे!”

मी तिला काही बोलणार तेवढ्यातच आम्हाला अचानक कुठलंतरी वाद्य वाजण्याचा आवाज आला.

“काय वाजतंय?” शिवानी म्हणाली.

फक्त शिवानीच नाही, तर किंबहुना तिथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आला असावा, कारण त्या खोलीतला सगळा धिंगाणा लगेच शांत झाला होता.

जरा लक्षपूर्वक ऐकल्यावर आमच्या लक्षात आले की तो आवाज एका कॅसिओचा होता.

आणि ते वाद्य वाजविणारा अजून कोणी नाही तर चक्क ‘ तो ‘ होता.

आणि एकदा का माझ्या मनात त्याच्याविषयी विचार येऊ लागले, की माझा मूड – ऑफ होणं नक्की.

“ए चला ना! आपण सगळे ‘Tandem walking’ करूया!” मी इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी म्हणाले.

जरा ही इथे तिथे नं डगमगता सरळ एका रेषेत चालणं याला ‘Tandem walking’ असे म्हणतात.

आमच्या मद्यधुंद अवस्थेत तसे चालणे तर अशक्यच म्हणावे लागेल.

तात्पुरते का होइना पण मी स्वतः सोबत इतरांना त्या खेळात मग्न करून घेतले आणि एक दुसऱ्याची धडपड बघून आम्ही जोरजोरात हसू लागलो.

पण तरीही माझ्या मनातून त्याच्या विषयीचा राग काही शमेना.

अखेर, स्वतःला त्याच्या विचारांपासून लांब ठेवण्याच्या ओघात मी असं काहीतरी बोलून गेले जे मला कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते.

“शशांक! शशांक! ए शशांक!”

“माझ्यासाठी एक सेक्सी डान्स कर ना!”

मी ते वाक्य बोलून पूर्ण करण्याच्या आतच मला जाणवले होते की दुसऱ्या खोलीतून येणारे कीबोर्डचे सुर शांत झाले होते. व त्याला वाजविणारा माझ्या अगदी समोर येऊन उभा राहिला होता.

माझी नजर माझ्या नकळतच त्याला मिळाली.

आणि तो काही न बोलताच मला सारं काही सांगून गेली.

Screenshot_20201208-092551_Chrome

“वर्षा? वर्षा?! अगं वर्षा, उठ!”

“स्वप्न आहे गं ते सारं. आपण आपल्या घरी सुखरूप आहोत. मी आहे अगं इथे तुझ्यासोबत! Please उठ!”

हर्षलच्या त्या कारुण्याने भरलेल्या आवाजाने अखेर मला भानावर आणले आणि मी बिछान्यावरून उठती झाले.

बहुतेक त्याला वाटत होते की दर रात्री प्रमाणे आजही मला झोपेत दुःस्वप्न पडले होते.

मला आज जे दिसले होते ते मात्र दू: स्वप्न नव्हते.

“मी आहे इथे तुझ्यासोबत, ठीके? काही नाही झालंय, कल्पना होती ती सारी.” हर्षल मला त्याच्या कुशीत घेत म्हणाला.

अजूनही पूर्ण भानावर आली नसल्याने मी काही क्षणासाठी त्याला काहीच उत्तर देऊ शकले नाही. केवळ त्याच्या मिठीत स्वतःला हरवून त्याला अगदी घट्ट कवटाळणं हाच काय तो माझा प्रतिसाद होता.

गेल्या ५-६ महिन्यापासून दर रात्री नित्यानियमाने हा प्रसंग आमच्या घरी घडायचा. मला कुठलं तरी भीषण स्वप्न पडायचं आणि मी झोपेत फार अस्वस्थ व्हायचे. आणि दरवेळी बिचारा हर्षल मला अलगद त्या स्वप्नातून जागं करून मला घट्ट मिठी मारायचा.

आणि या मागचे कारण होते ६ महिन्यापूर्वी आमच्या आयुष्यात घडलेला एक दुर्दैवी प्रसंग.

भरधाव वेगात घडलेला एक अपघात ज्यातून आम्ही कसेबसे, परंतु काहीच इजा न होता अगदी सुखरूप वाचलो होतो.

पण मृत्यूचे एवढ्या जवळून दर्शन झाल्यामुळे प्रत्येकाच्या शरीराला जरी काही दुखापत झाली नव्हती तरी मनाला मात्र झाली होती. आणि त्याची सर्वाधिक झळ जर कोणाला बसली होती तर ती व्यक्ती म्हणजे मी.

आणि त्या मागचे कारण?

महामार्गावरून काळोखात तावातावाने माझ्या नवऱ्याशी भांडत, साक्षात यमदुतला साकडं घालंत बेदरकारपणे गाडी चालवणारी ती महाभाग मीच होते.

खरं सांगायला गेलं तर त्या प्रसंगाने आमच्या आयुष्यात वाईटाच्या तुलनेने अनेकपटीने चांगले बदलच आणले होते.

माझे व माझ्या नवऱ्याचे अर्थात हर्षलचे संबंध, जे बरचशे माझ्याच अहंकारामुळे ताणले गेले होते ते नव्याने बहरले व वाढले. आमच्या चिमुकल्याच्या आयुष्यातली माझी गुंतवणूकही मी अनेक पटीने वाढवू लागले ते ही याच प्रसंगानंतर.

अगदी थोडक्यात सांगायला गेलं तर मृत्यूशी झालेल्या त्या चुकामुकीमुळे माझे पाय अखेर जमिनीवर पडायला लागले होते.

जे मला त्याने एका दशकापूर्वी सांगण्याचा प्रयत्न केला होता ते मला अखेर आता जाऊन उमगले होते.

वाऱ्यासारखी वाहून गेलेल्या ‘ मी ‘ ला अखेर तिच्यातील माणुसकी पुन्हा गवसली होती.

“आज मी जे पहिलं ते स्वप्न नव्हतं रे हर्षल.” मी अखेर स्वतः ला सावरत म्हणाले.

“म्हणजे?” हर्षल म्हणाला.

“ते अनेक वर्षांपूर्वीचे माझेच उपद्व्याप होते.” मी म्हणाले.

“जे झालं ते होऊन गेलं अगं. सगळं विसरून जा आता.” हर्षल माझे कुरळे केस कुरवाळत माझे सांतवन करीत म्हणाला.

“गेली अनेक वर्ष मी ह्याच तत्वांवर जगत आले आहे रे. पण काही चुकांना आपण नुसतं विसरून नाही चालत.” मी म्हणाले व तो परत काही बोलण्याच्या आता पुढे बोलती झाले,

“हर्षल मला एक पाच मिनिट दे फक्त. मी येते लगेच परत.” असे म्हणत मी त्याच्या खांद्यावरून प्रेमाने हाथ फिरवून उठले.

खिडकीतून येणाऱ्या सौम्य पण स्पष्ट चंद्रकिरणांनी आमच्या घराला एक सुंदर चंदेरी छटेने रेखाटले होते. बिछान्याच्या मधोमध अगदी निर्धास्तपणे झोपलेला आमचा चिमुकलाही काही त्याला अपवाद नव्हता. माझ्या दुःस्वप्नाचा त्याच्या साखरझोपेवर तिळमात्रही परिणाम झाला नव्हता हे पाहून मला खूप बरे वाटले. त्याची एक गोड पापी घेऊन मी पुढे माझ्या खोलीत चालती झाले.

एरवी पसाऱ्याने ग्रस्त असलेली माझी खोली आज मात्र एकदम स्वच्छ होती. त्यामागचे कारण होते परवा होणारे आमचे नवीन घरामधले शिफ्टिंग. त्यामुळे सारं काही अगदी व्यवस्थितरित्या खोक्यांमध्ये भरले गेले होते. आणि त्यातीलच, अचानकच हाती लागलेल्या एका वस्तुमुळेच बहुदा आज मला तो प्रसंग आठवला असावा.

खोका उघडल्यावर अगदी लगेचच मला तो फोटो हाथी लागला.

शिवानीने चोरून काढलेला तो फोटो फक्त माझा व त्याचा असा एकमेव फोटो होता. इतकी वर्ष माझ्याकडे तो अजूनही सुखरूप आहे याची मला आज संध्याकाळपर्यंत कल्पना देखील नव्हती. आणि त्या फोटोमागे अगदी बारीक अक्षरात लिहिलेला होता तो त्याचा मोबाईल नंबर.

गेल्या दहा वर्षात ना मला त्या क्रमांकावर संपर्क करायची गरज वाटली होती ना इच्छा. पण गेल्या काही महिन्यांपासून माझ्यातील पुनरुज्जीवित झालेली माणुसकी मला वारंवार त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगत होती.

कारण माझ्या मनाला हे व्यवस्थित माहिती होतं की त्याच्यासोबत मी कधीच न्याय केला नव्हता. आणि तो करायची उचित वेळही फार पूर्वीच निघून गेली होती.

पण तरीही, आज नव्याने आलेल्या हिंमतीने वं आत्ताच आठवलेल्या घटनांच्या शरमेने मला एकदातरी प्रयत्न करण्यास भाग पाडले.

आणि म्हणून, जरा कचरत व मनात शेकडो प्रश्नांचा भार घेऊन मी त्या नंबरवर अखेर फोन करती झाले.

* * *

Screenshot_20201208-093229_Chrome

“तू कशी आहेस आता?” त्याने तिला काळजीपूर्वक न्याहाळत विचारले.

जसं जसं ती त्याला तिच्या आयुष्यात घडलेली ती घटना आणि त्यानंतर तिच्यात झालेले बदल त्याला सांगत गेली, तसे तसे त्याचे चेहऱ्यावरचे भाव हे आधी क्रोध, मग आश्चर्य आणि कुतुहुल यांचा प्रवास करीत शेवटी काळजीवर येऊन स्थिरावले होते.

“दुःस्वप्न तर येतात हमखास दर रात्री. आणि जवळ जवळ दरवेळी त्या दुर्घटनेचीच. खरं सांगायचं झालं तर त्या दुःस्वप्नामुळेच आज मी इथे आली आहे.” ती स्वतःला सावरत म्हणाली.

“म्हणजे?” त्याने काहीसे आश्चर्याने तिला विचारले.

“ज्या रात्री मी तुला कॉल केला त्या रात्रीही मला एक दुःस्वप्न पडलं होतं.” ती म्हणाली.

“कोणतं?” त्याने विचारले.

” तू आणि मी दोघेही उपस्थीत होतो अश्या एकमेव हाऊस पार्टीचं.” ती म्हणली आणि त्याच्याकडे काहीसे संकोचाने पाहिले. ज्या मागचे कारण तर साहजिकच होते.

“अच्छा….”

फक्त एवढाच प्रतिसाद देऊन त्याने आपले लक्ष त्याच्या ताटात असलेल्या जेवणाकडे वळवले आणि निमूटपणे एक घास आपल्या तोंडात टाकला.

त्याच्या अत्यल्प प्रतिक्रियेने दचकून एका लहानग्या सुरात ती पुढे बोलती झाली,

“You know, I don’t drink anymore. हर्षलने convince केलं मला.” ज्यावर त्याने

“Good for you.” असे भावविरहित उत्तर तिला दिले.

त्याच्या त्या थंड प्रतिक्रिया ऐकून तिला जाणवले की जर तिला त्याच्या बरोबर संबंध पुनरप्रस्थापित करायचे असतील, तर त्यासाठी तिला अजूनही खूप मोठा पल्ला गाठावा लागणार होता.

तिने आतापर्यंत गाठलेला भौगोलिक पल्ला नव्हे, तर तिने त्यासोबत कधीही गाठायचा प्रयत्न न केलेला मानसिक पल्ला.

काहीश्या हिरमुसलेल्या चेहऱ्याने शेवटी तिनेही आपला मोर्चा स्वतःच्या जेवणाकडे वळवला.

बहुतेक त्यालाही स्वतःच्या बोलण्यातल्या कोरडेपणाची जाणिव झाली असावी कारण एक लांब श्वास घेत तो अखेर बोलता झाला,

“वर्षा, अगं त्या पार्टीमधले तुझे रूप आणि तुम्ही घातलेला तो धिंगाणा मी अजूनही विसरू शकलो नाहीये. आणि खरंतर त्यामुळेच ती आपली एकत्र अशी शेवटची पार्टी ठरली. नाही बघवलं मला ते…” बोलता – बोलता त्याला पुन्हा भरून आले आणि त्या कोरड्या मुखवट्या मागच्या तुडुंब भरलेल्या धरणाची जाणिव तिला परत एकदा झाली.

“I know. I am really sorry. मी वागण्यात खूप चुकले रे तेव्हा.” ती म्हणाली, आणि तिच्याही अश्रूंचा बांध पुन्हा फुटण्याची तिला भीती वाटू लागली.

“पण एक सांगू का रे तुला, सार्थक?” ती म्हणाली, आणि तो काही बोलण्याच्या आतच पुढे बोलती झाली,

“वागण्यात तर तूही चुकलास तेव्हा अरे!”

“आयुष्यात संबंध हे असे सहजा- सहजी नाही जुळत ना रे! मी तुझ्याविषयी काहीच न जाणल्या शिवाय तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा असं तू expect तरी कसा करायचास?”

प्रयत्न तर मी ही केलेच होते तेव्हा मला उचित वाटले तेवढे.

पण आपले एक दुसऱ्याशी काहीच संबंध नसताना तू माझ्याकडून एवढ्या अपेक्षा करणं, मला अस्वस्थ वाटेल असं माझ्या टोपण नावाने बोलावणं किंव्हा ते गिफ्टस….. त्यातील काही बाबी तर मी तुला वारंवार नको सांगितल्यावरही अरे!

आणि तुझ्या अपेक्षा पूर्ण न झाल्यावर शेवटी माझं मलाच वाईट वाटायचं. की मी एवढं काय वाईट वागले या पोराशी.”

तिच्या बोलण्याच्या ओघाने आणि त्यामागील भावनांच्या आर्ततेने सार्थकलाही हे जाणवले की तिने त्या गोष्टीचा बऱ्याच वेळ विचार केला होता.

“मान्य आहे ग मला तू जे म्हणते आहेस ते. मी ही चुकलोच होतो तेव्हा.

पण अगं, तुझ्या आताच्या बोलण्यात आणि तुझ्या दहा वर्षांपूर्वीच्या बोलण्याच्या सुरात आणि पद्धतीत किती फरक आहे ते तू स्वतःच पारखून बघ. मग तुलाच तुझ्या प्रश्नांची उत्तरे सापडतील.”

तो तिला म्हणाला.

उत्तरार्थ तिनेही मान हलवून स्वतःच्या चुकीची कबुली दिली.

“आणि वर्षा, तुला आठवतं तू मला त्या आधी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की मला थोडा वेळ दे?

मग जेव्हा तुला मला वेळ देण्याची वेळ आली तेव्हा तुला त्याचं महत्त्व कळलं नव्हतं का?

तेव्हा माझ्या आयुष्यात अनेक दुः प्रसंग एकत्र घडले होते अगं! मलाही तेव्हा जाणवलं होतं की माझंही वागणं चुकतंय ते. पण तेव्हा तू मला वेळ दिलाच नाहीस.”

वर्षानुवर्षे त्याने लपवून ठेवलेल्या राग, दुःख आणि अन्यायाच्या भावनेला आज अखेर पाझर फुटले होते. व त्याच्या अस्वस्थतेवरून तिला जाणवले की त्याला आज अजून बरंच काही बोलायचे होते.

इतकी वर्ष तिने सतत त्याला रोखून धरलं होतं. कायमच त्याची केवळ दोन वाक्ये ऐकून ‘ तू खूप बोललास आता ‘ व ‘ Keep it to yourself‘ म्हणून त्याला एक मोकळा श्वास घेण्यापासून रोखले होते.

त्याचे त्याच्या मनावर झालेले भीषण परिणाम आज अखेर तिला उमजत होते.

म्हणूनच आज त्याला त्याच्या मनातले सगळे विचार मांडण्याची मुभा तिला द्यायलाच हवी होती.

“आणि राहिला प्रश्न आपल्यातील संबंधांचा,” तो पुढे म्हणाला

“तुझं अजून कोणावर तरी प्रेम होतं. मान्य होतं की ते मला.

तुला कधीच माझ्याशी ‘ तसे ‘ संबंध नको हवे होते. हे ही मान्य होतं मला.

पण तू कधी माझ्याशी या विषयी सविस्तर बोलायला तयार होतीस?

आपले संबंध सुधारावे या साठी मी किती प्रयत्न केले आठवतंय तुला?

जर तू एकदातरी माझं म्हणणं ऐकून, तुझ्या कोणत्याही मित्र – मैत्रिणीला आपली ढाल न बनवता जर माझ्याशी मोकळेपणाने सगळं बोलली असतीस तर केव्हाच आपण एक असा मार्ग शोधून काढला असता ज्यावर आपण दोघेही खुश राहू शकलो असतो.

पण तू मात्र मला दर वेळेला साफ उडवून लावयचीस.

“हे तरी तुला मान्य आहे की नाही?” तो म्हणाला.

त्याचा तो रक्तबंबाळ चेहरा पाहून तिलाही आपले अश्रू अनावर झाले आणि तिने पुन्हा फक्त होकारार्थी मन डोलवत त्याला आश्र्वस्त केले.

“आणि वर्षा, मी साधा जरी जन्मजात असलो तरी मूर्ख मात्र मी कधीच नव्हतो. मला तुमचं कपट फार आधीच कळलं होतं

तुम्हाला काय वाटलं की एकदा का माझी इतर कोणाशी नाळ जुळली की तू परत येशील माझ्या आयुष्यात अशीच?

तुझ्या आणि तुझ्या मित्र – मैत्रिणींच्या एवढ्या क्रूर, निष्ठुर व निर्दयी वागण्या आणि बोळण्यानंतरही मी अगदी सहज तुला माझ्या आयुष्यात सामावून घेईन असा विचार करण्याची हिम्मत तरी कशी काय झाली तुम्हा लोकांची?!

एवढा अहंकार आणि माज तुमच्या अंगात?!

आणि काय ते,

Your idea of me is not my responsibility to live up to?!

What ‘nonsense’, वर्षा! What complete and ‘utter’ nonsense.

“सार्थक please, I can explain…” ती चपापून म्हणली. पण आता त्याच्या भावनांचा विस्फोटाला रोखणं अशक्य होते.

“अगं, सद्गुण आणि दुर्गुण, शुभ आणि अशुभ, चांगलं अथवा वाईट हे माणसाच्या काय तर त्याच्या अगदी प्रत्येक कृतीच्या अविभाज्य घटक असतात!

माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मी कायम तुझ्यातले चांगले तेच पाहायचा प्रयत्न केला!

नेहमीच!

म्हणून काय मला तुझ्यातले वाईट आणि भयंकर दुर्गुण माहीत नव्हते असं मुळीच नव्हतं.

मी तुला अगदी व्यवस्थित ओळखत होतो. तेव्हाही ओळखायचो आणि आजही ओळखतो. पण मला कायम तुझ्यातली ती चांगली बाजूच मांडायची इच्छा असायची.

पण तुझं लक्ष तर कायम माझ्या दुर्गुणानकडेच असायचं अगं!

हो. मी ही माणूस आहे. मग माझ्यात दुर्गुण तर असणारच. जे मी कायमच मान्य केले होते आणि आजही करायला तयार आहे.

पण तुझ्या तोंडून ना मी एकदाही, चुकूनही Sorry ऐकलं ना कधी स्वतःतल्या दुर्गुणानची साधी कबुली. इतकं अहंकारी असावं का माणसाने?

आणि माझे सद्गुण मान्य करणं तर दुरचीच गोष्ट.

तू कल्पना तरी करू शकतेस मला किती वाईट वाटलं असेल या गोष्टीचं ते?

सतत एका व्यक्तीकडून, जिच्या विषयी आपल्याला खरोखरच जिव्हाळा वाटतो त्या व्यक्तीकडून धड दोन शब्द कौतूकाचे निघत तर नाहीतच उलट त्या व्यक्तीला आपुलकीने आपल्याशी साधे चार शब्दही बोलणंही जड जातं?!

आणि, जेव्हा आपल्याला एका व्यक्तीचा एवढा जिव्हाळा असतो ना वर्षा, तेव्हा आपण त्याव्यक्तिशी कधीच ‘Normal’ वागू शकत नाही.

I wouldn’t have been able to ‘keep it simple’ even if I wanted to.

ही इतकी ‘simple’ गोष्ट ना कधी तुला समजली ना तुझ्या निर्लज्ज व क्रूर मित्र – मैत्रिणींना.

म्हणून मग मलाही कठोर पावलं उचलावी लागली.

जो पर्यंत तुला आणि तुझ्या त्या पलटणीला माणुसकीची समज येत नाही आणि तुमचा मुजोरपणा आणि घमेंड उतरत नाही तो पर्यंत मी तुमच्याशी नावापुरते देखील संबंध ठेवणार नाही.

अखेर, तुला काय वाटतं मी माझ्या मुलीचं नाव तुझ्यावर का ठेवलं?

सोप्पं नव्हतं गं ते आमच्यासाठी. विशेषतः माझ्या बायकोसाठी.

पण तुझ्यातले मला जे काही सद्गुण आठवत होते, ते मला जपायचे होते. संगोपन करायचे होते त्यांचे. तुझ्यातलं चांगलं ते आत्मसात करून तुझ्यातील वाईटाला दुजोरा न देण्याचा माझा प्रयत्न होता तो.

कारण तू कधी सुधार्शिल ही उम्मीद तर मी फार पूर्वीच हरवून गेलो होतो.”

थोड्या वेळासाठी टेबलच्या दोन्ही बाजूला स्मशानशांतता पसरली. सार्थकच्या फोनवरच्या बोलण्यावरूनच वर्षाला त्याने तिच्याविषयी असणाऱ्या विचारांना कुठेतरी आत लपवून ठेवलेले असल्याचे जाणवले होते. पण त्याच्या मनातल्या जखमा अजूनही इतक्या ओल्या असतील हे मात्र तिला वाटले नव्हते.

“सार्थक, तू आता माझ्या समोर जे मांडलं ते पूर्णपणे बरोबर होतं. I….. I mean we totally deserved it. पण मला ही गोष्टं कळली नाही की तू या सगळ्याचा स्वतःला इतकं त्रास का बरं करून घेतलास?” तिने त्याला एका मोठ्या बहिणीच्या सुरात विचारले.

“अरे कुठच्या कोण त्या माझ्या मैत्रिणी!

आणि कुठची कोण मी ही अरे!

तुझं माझ्यावर जरी एवढं प्रेम असलं तरी मी तुझ्याशी एवढं चुकीची वागलेली असताना तू का माझ्या आठवणींना एवढं घट्ट कवटाळून ठेवलय?

अन्याय माझ्यासोबत ही झाले आहेत आयुष्यात पण ह्याचा अर्थ हा नाही की मी त्यांना आयुष्यभर आपल्या सोबत घेऊन फिरले!

Sometimes you simply have to learn to let go. I am really sorry about everything that happened between us, but this I am telling you for your own good.

तुझा हा दुर्गुण मला तेव्हाही फार जास्त खटकायचा. तू माझ्या छोट्या – छोट्या चुकाही ना कधी स्वतः विसरायचा ना मला विसरू द्यायचास!

Agreed I never apologised, but not everything I did was intentional.

माणसाच्या हातून नकळत ही चुका होतात अरे. तू दरवेळेला त्या व्यक्तीला त्याचा हिशोब नाही विचारू शकत.

अश्या वेळी शेवटी विसरून जाणंच हिताचं ठरतं. आपल्यासाठीही आणि समोरच्यासाठीही.” ती त्याची समजूत काढत म्हणाली.

तिचे संपूर्ण बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर त्याने आपले डोळे स्वतःच्या ताटावरून उंचावून तिला मिळवले व तो म्हणाला

“हो गं, बरोबर आहे तुझं. चुकलंच ते माझं.”

सार्थकने दिलेली ती कबूली ऐकून वर्षाच्याही जीवात जीव आला व तिच्या ओठांवर एक लहानसं हसू पसरले.

तिचे ते हसू पाहून तो ही गालातल्या गालात हसला आणि त्या नजरभेटीत त्यांच्यातल्या वर्षानुवर्षांच्या कतुटेचे ओझे अखेर वितळू लागल्याचे दोघांनाही जाणवले.

“Friends?” ती म्हणली आणि स्वतःचा हाथ मिळवणीसाठी पुढे केला.

सार्थकला त्याने अनेक वर्षांपूर्वी सुरुवात केलेल्या त्या पोरकट, निरागस प्रथेची तिला अजूनही आठवण आहे हे पाहून गहिवरून आले व त्याने अतिशय आनंदाने तिचा हात मिळवला.

“Friends.” तो ही मनमोकळेपणे हसत म्हणाला.

तितक्यात त्यांचा वेटर त्यांच्याकडे बिल घेऊन आला आणि दोघांनी आपापले पैसे मोजून त्याच्याकडे सुपूर्त केले.

“तसं, अजून किती दिवस मुक्कामी आहेस तू?” त्याने तिला निघण्याच्या तयारीत आपली बॅग उचलत विचारले.

” चाललेय मी लगेचच. आज रात्रीचीच १०:४५ ची गाडी आहे माझी.” तीही उभी राहत आपले सामान उचलत म्हणली.

“अच्छा. मग आता दिवसभराचा काय प्लॅन आहे?” त्याने विचारले.

मनातल्या मनात थोड्या वेळ विचार करून अखेर तिने त्याला विचारले

“सार्थक, तुझं अजूनही ते स्वप्न आहे का?”

“कोणतं?” त्याने कुतूहलाने विचारले.

त्यांची पुन्हा नजर भेट होताच त्याला ती विचारात असणाऱ्या स्वप्नाची आठवण झाली.

“अच्छा, ते! लक्षात बरं राहिलं तुझ्या!” सार्थक आश्चर्याने म्हणाला.

“तू जसंकी विसरू दिलं होतं मला तेव्हा!” वर्षा त्याला मिश्कीलपणे टोला लगावत म्हणाली.

१० वर्षांपुर्वी सार्थकने वर्षाला त्याचे तिच्यासोबत समुद्रकिनारी जाण्याचे स्वप्न असण्याचे सांगितले होते. आणि तेथूनच त्यांचा वाद विकोपाला पोहोचला होता.

साहजिकच कोणी कितीही म्हणालं तरी ते दोघेही ती गोष्ट विसरणार नव्हतेच!

” तुझ्या त्या ‘I don’t think that is a good idea’ च काय झालं?” त्याने तिला मस्करित पण करड्या अश्या सुरात विचारले.

सार्थकच्या चोख प्रत्युत्तराने वर्षाला तिने घमेंडीच्या नादात त्याला दिलेल्या तिरकस व उद्धट जवाबाची आठवण झाली व तिचा चेहरा पुन्हा लहान व हिरमुसलेला झाला.

“तसं नाही रे. फक्त ज्यामुळे सगळा गोंधळ सुरू झाला तो मला तिथेच जाऊन विसर्जित करायची इच्छा होती. कारण शेवटी पूर्वीचं सगळं विसर्जित केल्यावरच आपल्याला आपले संबंध व्यवस्थित पूनरप्रस्थापित करता येतील. नाही?”

ती म्हणाली.

त्यांच्या मधील संबंधांचे तिने मांडलेले ते काव्यात्मक परंतु अचूक वर्णन सार्थकला मनापासून आवडले व म्हणून त्याने वर्षाला एका स्मितहास्यने होकार दिला आणि ते दोघेही त्या रेस्टॉरंट मधून एकत्र बाहेर पडले.

आपल्या नात्याला पुनरुज्जीवित करण्यार्थ.

* * *

Screenshot_20201208-091954_Chrome

13 Comments Add yours

 1. A says:

  Ok! Marathimanus. 😋

  Liked by 2 people

  1. 😅😂 हो तर! तुम्ही पण का?

   Liked by 2 people

   1. A says:

    Sorry, I didn’t get this. 😋

    Liked by 1 person

    1. Was just asking whether you were Marathi as well. But I think I got my answer! 😅😂

     Liked by 2 people

 2. Ramya A R says:

  will be waiting for the english version…

  Liked by 2 people

  1. Sure! Will try to publish it ASAP. Thank you for stopping by! 😊✌️

   Liked by 2 people

 3. Laleh Chini says:

  Happy Holidays.<3

  Liked by 1 person

 4. Loku says:

  खूपचं चांगल storyteller आहे तुम्ही. 😜

  Liked by 1 person

  1. 😅😂 आपल्या मौल्यवान comment बद्दल मी खूप आभारी आहे!

   Like

   1. Loku says:

    😆😆😆

    Liked by 1 person

 5. MonikaJeneva says:

  I’m sorry, my friend. I keep ‘liking” your post, but WordPress then switches the button back to initial setting. I do ‘Like’ your writing. 💕

  Liked by 1 person

  1. No worries! It’s really kind of you to drop in a comment to let me know it. Thanks a lot for your feedback!

   Stay safe and stay tuned! 😊

   Liked by 1 person

   1. BBYCGN says:

    You too, dear friend!

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s