संबंध

(Note:- This post, in it’s entirety has been written in Marathi, an Indian language. Non-Marathi/Overseas readers, pray stay tuned for a probable English version in near future. And of course I’d be really pleased if you could have a look at some of my other posts in English in the meanwhile!😅)

नमस्कार बांधवांन्नो आणि भगिनिंनो!

आपल्याला या मंचावर भेटून बराच वेळ होऊन गेला, नाही? तब्बल एक वर्षाने आज मी तुमच्यासमोर आपल्या लाडक्या मायबोलीत ही लघुकथा सादर करीत आहे. आणि या कथे मागची संकल्पना समजून घेण्यासाठी मी तुम्हाला माझे या पूर्वी लिहिलेले मराठीतले लेख आवर्जून वाचण्यास सुचवेन, ज्यांची लिंक मी इथे खाली दिली आहे.

माझं पहिलं प्रेम

समुद्र

तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद! आता आपण या मालिकेतल्या पुढच्या प्रसंग अनुभवण्यासाठी सज्ज झालो आहोत. पण आजची कहाणी पहिल्या दोघांपेक्षा जरा वेगळी आहे.

कशी?

अहो, ते वाचल्यावर समजेल की!

संबंध

Relationship breakups. A man and a woman in the evening shadow standing opposite to each other. स्त्री पुरुषातलं नातं संबंध सायंकाळी सावलीरूप एकमेकांच्या विरोधात अथवा प्रेमात. प्रेमकथा. Lovers love story

“हॅलो?”

त्या क्रमांकावर कॉल करून मला तब्बल १० वर्षे लोटली होती. साहजिकच मनात शंका-कुशंकांचा डाव जोमात रंगत होता. मला आठवत असलेला नंबर बरोबर आहे का? माझा कॉल उचलला जाईल का? आणि जरी उचलला गेला तरी समोरची व्यक्ती ओळखेल का मला? आणि जरी ओळखलं तर काय प्रतिसाद असेल त्या व्यक्तीचा? आपुलकीचा? कि अरेराविचा?

पण… फोन मधून ऐकू येणाऱ्या त्या आवाजाने मला चांगलेच गोंधळात टाकले.

कारण तो आवाज होता एका एवलीश्या चिमुरडीचा.

“हॅलो?” ती परत म्हणाली, यंदा चौकशीच्या सुरात.

त्या निरागस मुलीचा आवाज ऐकून मी साफ गोंधळात पडले. डायल केलेला क्रमांक पुन्हा तपासून पहिला. हो. तो तर बरोबरच होता.

मग ही कोण?

अखेर तीच माझ्या मदतीला धावून आली.

“तुम्हाला माझ्या बाबांशी बोलायचं आहे का?”

बाबा! अरे हो! त्याचं लग्न झाल्याचे मी ऐकले होते खरे… पण त्या बातमीला एवढी वर्ष लोटली होती हे मात्र मी विसरून गेले होते. खरंच, किती बदलली होती आमची आयुष्य गेल्या दशकात!

“हो…” मी जरा कचरतच म्हणाले.

“माझे बाबा हात धुवायला गेलेत. तुम्ही कोण बोलताय?” तिने मला विचारले.

तिचा तो निष्पाप प्रश्न माझ्या उभ्या आयुष्यातल्या सर्वात कठीण प्रश्ननांच्या यादी मध्ये अव्वल स्थान पटकावेल असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. कारण खरं सांगायला गेलं तर आमच्यात जी काही तुटपुंजी मैत्री होती ती साधारण एका दशकापूर्वीच भावनांच्या ‘त्या’ महापुरात वाहून गेली होती. पण ते मी या निरागस जीवाला अखेर कसे समजावणार?

“मी…. मी तुझ्या बाबांची मैत्रीण बोलतेय.” असे शेवटी मी तिला एका हळू आवाजात सांगितले. आणि तो वर ती लगेच,

“बाबा! बाबा! तुझ्या फ़्रेंडचा कॉल आहे!” असे त्या मोबाईल मध्येच बोलत म्हणाली. अगदी आनंदात.

तिचा तो उत्साह ऐकून मलाही आपले हसू अनावर झाले.

“नाव काय गं तुझं?” मी तिला लाडाने विचारलं.

त्यावर त्या चिमुकलीने लगेच आपलं नाव सांगितलं. आपलं पूर्ण नाव. जसं शाळेत शिकवतात तसंच.

ते नाव ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला.

कारण ते नाव माझंही असू शकलं असतं.

जर आमच्यात जे घडलं ते तसं घडलं नसतं तर.

आणि तितक्यातच, एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच, त्याचा आवाज माझ्या कानी पडला.

“हॅलो” तो म्हणाला, त्याच्या नेहमीच्याच साधारण गंभीर अश्या सुरात.

“हॅलो…” एक लांब श्वास घेत मी म्हणाले. सहाजिकच माझ्या आवाजात माझ्या मनातल्या कोट्यवधी प्रश्नांचा भार उतरलाच होता.

पण माझ्या त्या थरथरणाऱ्या आवाजाचेही त्याने काही क्षणातच अचूक निदान केले.

“वर्षा? अगं तू?!” तो आश्चर्याने म्हणाला.

“हो. मी बोलतेय…” मी म्हणाले.

१० वर्षानंतरचा हा आमचा पहिला संवाद. बोलायला एका अर्थी बघायला गेलं तर खूप काही होतं, पण तरीही असंहि वाटत होतं की काहीही नव्हतं. आणि बहुदा याच परसपर विरोधी विचारांनामुळे दोन्ही बाजूला स्मशानशांतता पसरली.

सुदैवाने, शेवटी त्यानेच ती मोडली.

“आज कसं काय, अचानक?” त्याने मला विचारले.

“अगदी सहज..” मी लगेच म्हणाले. आणि बोल्या-बोल्याच धास्तावले. कारण आमचा इतिहास पाहता तसे होणे तर अशक्यच मानावे लागेल.

“तू अजूनही नाही सुधारली ना!…”

त्याने जरी ते शब्द हसत-हसतच उच्चारले होते तरीही त्याच्या आवाजात नाराजीचा व रागाचा सूर होताच.

“म्हणजे?..”

त्याच्याशी खोटं बोलणं ना मला तेव्हा जमलं होतं ना आजही जमलं. कारण माझ्या शब्दांपेक्षा जास्त त्याचं लक्ष माझ्या भावनांवरच असायचं. कायमच.

“अरे… खरंतर आज मी माझी खोली रिकामी करत होते. सगळ्या गोष्टी इथून तिथे हलवताना अचानकच मला आपला तो फोटो सापडला. आठवतो का तुला तू?” मी त्याला विचारलं.

“होय तर. एकुलता एकच तर आहे.” तो अगदी आपुलकीने म्हणाला.

खरंच. आमच्या मैत्रीणीने काढलेला तो फोटो एकत्र असा आमचा शेवटचा असेल असे मला कधीच वाटले नव्हते. पण… दुर्दैवाने हो. ते चित्रच काय ते आमच्या एकेकाळच्या नात्याची शेवटची खुण होऊन बसले.

“त्याच्याकढे बघून असं वाटलं की… काय चालू असेल या पोराच्या जीवनामध्ये आता?” मी म्हणाले आणि माझ्या आवाजात पहिल्यांदाच मला कुठेतरी ते अजूनही खुपत असण्याची भावना उतरली. आणि बहुदा त्याला हि ती जाणवली. म्हणूनच त्याने आमचे संभाषण थोडे हलके करायचा प्रयत्न केला.

“हं. तसं आज तुला खोली साफ करायचा मुहूर्त कुठून सापडला?” त्याने मला विचारले.

बरोबर पकडलं त्याने मला. कारण या बाबतीतला माझा आळसुटलेपणा तर जगजहाय्यच होता!

“नवीन घर घेतोय आम्ही.” मी म्हणले. अर्थात गेल्या दहा वर्षात माझंही कुटुंब प्रस्थापित झालं होतं की.

“वा! अभिनंदन!” तो कौतुकाने म्हणाला.

“थँक यू!”

आणि म्हणता-म्हणता परत तीच स्मशानशांतता आम्हात पसरली. पण या वेळी ती मी मोडली. कारण मला त्याला काहीतरी महत्वाचे विचारायचे होते. प्रश्न फक्त एवढाच होता की तो विचारायचा कसा.

“तुझी मुलगी खूप गोड आहे.” मी जरा दबक्या सुरात म्हणले.

“हो… थँक्स” तो खुशीत म्हणाला. आणि त्याच्या त्या आनंदाच्या सुरानेच मला तो प्रश्न विचारण्याची हिम्मत दिली. कारण त्याच्या आवाजातून मला त्याचं आपल्या मुलींवर फार प्रेम असल्याचे ठळकपणे जाणवले.

“एक विचारू?”

“विचार” तो अगदी सहज म्हणाला.

“तू तुझ्या मुलीचं नाव…”

प्रश्न विचारायला मी सुरवात केली खरी, पण तो प्रश्नच मुळात असा होता की तो विचारायला कोणीही लाजेल. किंबहुना, एवढ्या वर्षांनंतरही तसा विचार करणं अहंकाराचच लक्षण ठरेल. पण मी त्याच्या स्वभावाला व्यवस्थित जाणून होते. आणि म्हणूनच मला ते विचारल्याशिवाय राहवणार नव्हते.

“आय मीन, तिचं नाव तू…”

मी माझा प्रश्न मांडायचा पुन्हा प्रयत्न केला. पण तो हि परत आधीसारखाच हवेतच विरला.

न जाणे का पण अगदी लहानपणापासूनच माझा स्वभाव असाच साधारण भिडस्त होता. समोरच्याला कणखर सुरात जाब विचारणं मला तेवढं जमायचं नाही. आणि माझ्या स्वभावातल्या या उणीवा त्याने अनेक वेळा ओळखल्या व अनुभवल्या होत्या. पण तरीही त्याने त्या मान्य कधीच केल्या नव्हत्या. आणि म्हणूनच आमच्यात कायम गैरसमज व भांडणं होत राहिली.

आज मात्र अधांतरी राहिलेल्या माझ्या वाक्याची त्यानेच पूर्णता केली. आणि माझा अंदाज बरोबर ठरवला.

“होय. तुझ्यावरच ठेवलंय.” माझ्या भावना समजत तो जरा मिश्किल अश्या सुरातच म्हणाला.

“का रे? म्हणजे आपल्यात जे झालं त्यानंतरही तू… ” मी म्हणाले. मनात तीच टांगती तलवार बाळगून जी मी या संवादाच्या सुरवातीपासूनच बाळगुन होते. मला उत्तर देईल का तो?

त्याने उत्तर तर दिलंच. आणि ते ही असं कि ज्याच्या पुढे माझं मन साफ हरलं.

“एक इच्छा होती गं. तुला आपल्या आयुष्यात सामावून घेण्याची. त्याचा एक अविभाज्य घटक बनवायची. पण जेव्हा तुलाच कोणताही प्रकारचा संबंध नकोसा झाला तेव्हा माझ्यासाठी ते अशक्यप्राय होऊन बसलं…मी तुला तेव्हाही हेच सांगू इच्छित होतो गं.

संबंध जपणं आणि वाढवणं हे आपल्या हातात असतं. नुसता आपला काही संबंध येत नाही असं म्हटलं तर या जगात कधी मैत्री होईल का? आणि जर ते व्हायचं असेल तरच ते होईल असच जर प्रत्येकाने म्हटलं तर कधी प्रेम जुळेल का? कधी कळणार होतं ग तुला हे?

आणि तसंही, जर तू माझ्या आयुष्यात नस्तीस तर आज मी जसा आहे आणि जिथे आहे तिथे कदाचित नसलो असतो. म्हणून तसेही तुझे उपकार आहेतच माझ्यावर. मग तुला आवडो कि न आवडो.”

एका दशकानंतरही त्याच्या आवाजातला तो ओलावा ऐकून माझाही कंठ भरून आल्याशिवाय राहिला नाही. आणि म्हणूनच बोलायची इच्छा असूनही माझ्या तोंडून एकही शब्द निघाला नाही.

माझ्या त्या शांततेचा मात्र त्याने चुकीचा निष्कर्ष काढला.

“असो…” तो थोड्या निराशेच्या सुरातच म्हणाला.

खरं सांगायला गेलं तर आमच्यात जे घडलं त्यात चूक माझीही होतीच. त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे ह्याची कल्पना मला फार आधी पासूनच होती. पण माझ्या मनाने मात्र ते कधीच मान्य केली नव्हते. व म्हणूनच त्याला झिडकारून कायम माझ्या पासून लांबच ठेवले होते.

कारण प्रेम स्विकारूनही नाकारता येते हे मला कळून चुके पर्यंत फार उशीर झालेला होता. निदान असे मला त्या क्षणापर्यंत तरी वाटत होते.

“नाही, थांब!” मी अगदी निश्चयाने म्हणाले. आणि तो काही बोलायच्या आतच पुढे बोलती झाले,

“ऐक. मी पुढच्या महिन्यात तुझ्या शहरात येतेय. तेव्हा भेटायचं का आपण?”

“हो, चालेल. का गं?” त्याने मला कुतूहलाने विचारले.

त्याच्या त्या निरागस प्रश्नावर जरा हसतच मी म्हणाले,

“अरे, तूच तर म्हणालास आता! संबंध जपण्यासाठी…”

एक मुलगा व मुलगी सायंकाळी सूर्यास्त एकमेकांसोबत बसलेले. नातं, संबंध. A man and a woman sitting together under the evening setting sun shadowed. New leaf in relationship

24 Comments »

  • 😅 It’s actually an awkward interaction between two estranged people after 10 long years, explaining how some relations go above and beyond conflicts and hence are worth cherishing.

   I don’t know how fluent you are in Marathi, but for those who know the language, it’s simple to understand.

   I may write another post based on this in English… Not quite sure about it yet though.

   Regardless, I am really thankful that you read my post! 😊✌️

   Liked by 2 people

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s